भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ करीता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर

पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीचे आवाहन
पंढरपूर, दि. 07 :- भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागाच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ करीता मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पंढरपूर तालुक्यात मतदार नोंदणीला दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पासून प्रारंभ झालेला असून, अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीत नांव नोंदवावे, असे आवाहन पदनिर्देशीत अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
पदवीधर व शिक्षक या दोन मतदारसंघाची नव्याने मतदार यादी तयार करण्याकरीता दि. ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. पंढरपूर तालुक्यात शिक्षक मतदारसंघाकरीता ०८ मतदान केंद्रामध्ये पंढरपूर शहर ०२, पुळूज, करकंब, पट. कुरोली, कासेगाव, भाळवणी, तुंगत येथे प्रत्येकी ०१ व पदवीधर मतदारसंघाकरीता १२ मतदान केंद्रामध्ये पंढरपूर शहर येथे ०५, करकंब येथे ०२, पुळूज, पट. कुरोली, कासेगाव, भाळवणी, तुंगत येथे प्रत्येकी ०१ केंद्र याप्रमाणे अशी एकूण २० प्रारूप मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत.
पदवीधर मतदारसंघाकरीता मतदार नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक १८ हा फॉर्म आणि शिक्षक मतदारसंघाकरीता मतदार नोंदणीसाठी अर्ज नमुना क्रमांक १९ हा पात्र मतदारांनी भरून दयायचा आहे. पदवीधर मतदार नोंदणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahaelection.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मतदार नोंदणीकरीता एकूण ०७ पदनिर्देशीत अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मतदार नोंदणी ०६ नोव्हेंबर २०२५ या तारखेपुर्वी दोन्ही मतदारसंघाकरीता पात्र मतदारांनी नांव नोंदवावे, असे आवाहनही पदनिर्देशीत अधिकारी तथा तहसिलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.