कर्नाटक, गोव्यानंतर आता बंडाचा नंबर महाराष्ट्राचा ?भाजप-सेनेत प्रवेशासाठी खलबते मात्र मतदारसंघाची अडचण

कर्नाटक, गोव्यानंतर आता बंडाचा नंबर महाराष्ट्राचा ?भाजप-सेनेत प्रवेशासाठी खलबते मात्र मतदारसंघाची अडचण मुंबई : कर्नाटक व गोव्यातील काँग्रेसच्या बंडानंतर आता महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारांच्या बंडाचे वादळ घोंघावणार असल्याचे संकेत आहेत. आघाडीतील अनेक आमदार भाजप-शिवसेनेत प्रवेशाच्या प्रयत्नात असून कोणत्याही क्षणी ते पक्ष सोडणार असल्याचे चित्र आहे. यासाठी भाजप व शिवसेनेतील काही नेत्यांशी त्यांनी संपर्क साधून प्रवेशाचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत केवळ निवडून येण्याच्या निकषावरच हे आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत; मात्र भाजप व शिवसेना युती असल्याने मतदारसंघाचे वाटप कसे होते, याबाबत या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या काही दिग्गज आमदारांनी तर विश्‍वासू कार्यकर्त्यांना आपण निवडणूक लढणार तर आहोतच. तुम्ही कामाला लागा; मात्र पक्ष कोणता, याबाबत जाहीर प्रचार करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीदेखील स्वत:चा पक्ष सोडून मतदारसंघातील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठका वाढवल्या आहेत.काँग्रेसमधून राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर आता काँग्रेसचा राजीनामा दिलेले अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे हेदेखील काँग्रेस पक्षात नाराज आहेत. त्यातच आज पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी पाहुणचार घेतल्याने त्यांचीही वाट भाजपच्या दिशेने असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माढ्याचे बबनदादा शिंदे, बार्शीचे दिलीप सोपल, श्रीवर्धनचे अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे आमदारदेखील पक्षांतराच्या तयारीत असल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनीही शिवसेनेत प्रवेश करून राज्यमंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवले. यामुळे युतीकडे असलेल्या मतदारसंघातील आघाडीचे आमदार सोयीने पक्षांतर करत असले, तरी इच्छुकांना भाजपच जवळचा पक्ष वाटत आहे. त्यातच भाजप नेत्यांनी पक्षात आला, तर विजयाची हमखास खात्री असा परवलीचा शब्द देण्यास सुरुवात केली असून आघाडीच्या आमदारांमध्ये याचीच सर्वाधिक धास्ती असल्याचे चित्र आहे. भाजप आणि शिवसेनेत प्रवेशासाठी आमदारांची तयारी असली तरीही युतीत संबंधित आमदारांचा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो, यावरच त्यांचा पक्षप्रवेश अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.फडणवीस-उद्धव यांच्यावरच पक्षांतराची मदार
या महिन्याअखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीतल्या जागावाटपाचे व मतदारसंघ आदलाबदलीचे चित्र निश्‍चित होणार आहे. त्यानंतरच आघाडीतील आमदारांचे पक्षांतर संबंधित पक्षात होईल. त्यासाठी स्वत: मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे समन्वयाने या आमदारांना कोणत्या पक्षात प्रवेश घ्यावा याची हमी देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

99 thoughts on “कर्नाटक, गोव्यानंतर आता बंडाचा नंबर महाराष्ट्राचा ?भाजप-सेनेत प्रवेशासाठी खलबते मात्र मतदारसंघाची अडचण

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!