पंढरपूर अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई -तहसिलदार- सचिन लंगुटे

पंढरपूर अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई -तहसिलदार- सचिन लंगुटे
पंढरपूर -अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे. चंद्रभागा नदी पात्रात जुन्या दगडी पुलाजवळ अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पो तसेच मौजे गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रालगत एक जेसीबी व एक टिपर अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली. सदरच्या दोन्ही कारवाई महसूल पथकाने पहाटे ५.०० ते सकाळी ८.०० वाजताच्या दरम्यान केली. सदर कारवाई मधील वाहने शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आली आहेत.
या दोन्ही कारवाईमध्ये मंडळ अधिकारी विजय शिवशरण, बाळासाहेब कदम, राजेंद्र वाघमारे ग्राम महसूल अधिकारी प्रमोद खंडागळे , महेशकुमार सावंत, गणेश पिसे, संजय खंडागळे रविकिरण लोखंडे , पि पि कोईगडे ,आर बी खंदारे ,राहुल गुटाळ व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस हवलदार हनुमंत शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल आवटे, सूर्यवंशी व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.