सहा तास रांगेत प्रतीक्षा दर्शनावेळी मात्र धक्काबुक्की खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना केली जातेय धक्काबुक्की पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धक्कादायक प्रकार

सहा तास रांगेत प्रतीक्षा दर्शनावेळी मात्र धक्काबुक्की
खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना केली जातेय धक्काबुक्की
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील धक्कादायक प्रकार
पंढरपूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक पंढरीला येत असतात. आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे यासाठी हे भाविक मिळेल त्या वाहनाने अनेक तासांचा प्रवास पंढरीत दाखल होत असतात.त्यानंतर श्री विठ्ठलाच्या दर्शन रांगेत सहा ते सात तास त्यांना ताटकळत उभे राहावे लागते.मात्र एवढ्या वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही विठुरायाच्या ऐन दर्शना वेळी विठुरायाजवळ उभे असणाऱ्या खासगी महिला सुरक्षा कर्मचाऱ्याकडून भाविकांना अरेरावीची भाषा करत धक्काबुक्की केली जात आहे. यासोबतच विठुरायाच्या पायाला साधा स्पर्शही करू न देता अगदी एक-दोन सेकंद दर्शनही घेऊ दिले जात नसल्याने संपूर्ण राज्यभरातील भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या सलग सुट्ट्यांमुळे तसेच श्रावण महिन्यामुळे पंढरीतील भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच काल नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सणानिमित्त महिला भाविक हजारोंच्या संख्येने पंढरीत दाखल झाल्या होत्या.मात्र सात तास ताटकळत रांगेत प्रतीक्षा करूनही ऐन दर्शनाच्या वेळी मात्र गाभाऱ्यातील सुरक्षारक्षक महिला कर्मचाऱ्याकडून महिला भाविकांना अरेरावीची भाषा करत दर्शन न करू देताच ओढून ढकलून दिले जात होते.त्यामुळे महिला व भाविकांकडून मंदिर प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. या अगोदरही अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत. वयोवृद्ध व वयाने ज्येष्ठ असणाऱ्या भाविक भक्तांसोबतही सुरक्षा रक्षकांकडून केली जाणारी ही भाषा व धक्काबुक्की अशोभनीय असली तरी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाही अद्याप पर्यंत होत नसल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.तक्रारीसाठी सदर ठिकाणी मंदिर समितीचे व्यवस्थापक सहसा उपस्थित नसतात. याचबरोबर त्यांच्याशी संपर्क केला असता फोनवरही बोलण्यास ते टाळाटाळ करत असल्याने भाविकांनी नक्की कुणाकडे दाद मागावी असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.अनेक वेळा याबाबत आवाजही उठवण्यात आला आहे.मात्र तक्रारदार व्यक्तीलाच उलट प्रश्न करत प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने नक्की कुणाच्या दबावाखाली प्रशासन काम करते असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला जात आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नेहमीप्रमाणे संपर्क करण्याचे टाळले. तर पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी व मंदिर समितीचे प्रमुख श्री सचिन इथापे यांनी याबाबत चौकशी करून योग्य ते कारवाई करू असे आश्वासन यावेळी दिले.
पेड दर्शनाचा मुद्दा ऐरणीवर
श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी खाजगी व्यक्तींमार्फत पैसे घेऊन पेड दर्शन करून दिले जात असल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. दोन दिवसांपूर्वी असाच एक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. खाजगी व्यक्तींमार्फत पैसे घेऊन पेड दर्शन करून दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने स्वतःहून पेड दर्शन सुरू करावे व त्यातून येणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरावा असाही सूर यानिमित्ताने जाणकार व्यक्तीमंधून उमटत आहे.