पंढरपूर वाढीव घरपट्टी रद्द करून दाळे गल्लीस मूलभूत सुविधा पुरवाव्यात समाजसेवक बिभीषण गोसावी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
वाढीव घरपट्टी रद्द करून
दाळे गल्लीस मूलभूत सुविधा पुरवाव्यात
समाजसेवक बिभीषण गोसावी यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील दाळे गल्ली परिसरास मूलभूत समस्यांनी ग्रासले असून, या समस्या दूर कराव्यात, तसेच पंढरपूर नगरपरिषदेने आकारलेली वाढीव घरपट्टी आणि खणपट्टी रद्द करावी,
अशी मागणी बिभीषण उर्फ प्रीतम अरविंदगीर गोसावी यांनी, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्याकडे केली आहे. पंढरपूर शहरातून करण्यात आलेली ही पहिली मागणी असून, या मागणीचे या परिसरातून कौतुक होत आहे.
पंढरपूर शहरातील दाळे गल्लीत रस्त्यांची अवस्था
दयनीय आहे. पिण्याच्या पाण्यात अशुद्ध आणि मलयुक्त पाणी येत असल्याने, नागरिक आजारांना बळी पडत आहेत. कचरा आणि धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे, नागरिकांना सर्दीसारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे.
तुंबलेल्या गटारींमुळे डासांचे प्रमाण वाढले असून हिवताप, मलेरिया आदींसारखे संसर्गजन्य
आजार पसरू लागले आहेत. पंढरपूर शहरात आणि उपनगरात ठिकठिकाणी रस्त्यांची बांधकामे होत असताना, दाळे गल्लीत मात्र रस्त्यांची अवस्था अगदी वाईट आहे. येथील नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात, आणि
नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेला वाढीव कर रद्द करण्याची मागणी बिभिषण उर्फ प्रीतम अरविंदगीर गोसावी यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन गोसावी यांनी २९ नोव्हेंबर रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी वाळूजकर यांना दिले आहे. याप्रसंगी त्यांच्या समवेत नागेश सावळासकर, गुरुनाथ दहिवडकर, अमोल वाखारकर, सुरज सोनवळकर यांच्यासह दाळे गल्लीतील इतर नागरिक उपस्थित होते.