डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राजगुरुनगर व मंचर बायपासच्या मागणीला अखेर यश!

पुणे | गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना यश आले असून राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांची निविदा नुकतीच उघडण्यात आली आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या दोन्ही बायपासचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चांडोली ते आळेफाटा (पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लोकसभा निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरली होती. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी निवडून आल्यावर या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते. त्यानुसार सुरुवातीला नारायणगाव आणि खेडघाट येथील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यातील अडचणी दूर केल्या. डॉ. कोल्हे यांनी स्वत: पुढाकार घेऊन विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला. त्यामुळे या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे सुरू झाली. येत्या काही काळात हे दोन्ही बायपास रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.

ऑगस्ट अखेर नारायणगाव व खेड घाट बायपास सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच डॉ. कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांच्या कामांची लॉकडाऊनमुळे लांबलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४.९८१ कि.मी. लांबी असलेला राजगुरुनगर आणि ७.४७६ कि.मी. लांबीचा मंचर बायपास त्याचबरोबर पेठ गाव ०.६८० कि.मी व एकलहरे ते रविकिरण हॉटेल १ कि.मी. या कामांना तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर सुरुवात होईल. मूळ रु. २१६.५८ कोटींची निविदा असलेले हे सुमारे २२ टक्के कमी (रु. १६९.८३ कोटी) निविदा भरलेल्या टी अॅण्ड टी इन्फ्रा, पुणे या कंपनीला मिळाले आहे.

राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांची कामे मार्गी लागत असतानाच कळंब आणि आळेफाटा बायपास रस्त्यांची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली असून ३० जुलै २०२० ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, चांडोली ते आळेफाटा (पुणे हद्दीपर्यंत) या दरम्यानची सर्वच बायपास रस्त्यांची मार्गी लावून येथील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. लॉकडाऊनमुळे मोशी ते चांडोली टप्प्याचे सहापदरीकरणासाठीचे भूसंपादन होऊ शकलेले नाही. मात्र कोरोनाची परिस्थिती निवळताच नाशिक फाटा ते मोशी आणि मोशी ते चांडोली या दोन्ही टप्प्यातील भूसंपादनातील अडचणी दूर करून हे काम मार्गी लावण्याला माझे प्राधान्य राहणार आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

1 thought on “डॉ. अमोल कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर राजगुरुनगर व मंचर बायपासच्या मागणीला अखेर यश!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या