शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी

शेगाव दुमाला चौक ते जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास मनाई
उपविभागीय दंडाधिकारी इथापे यांनी आदेश केले जारी


पंढरपूर (दि.23):- आषाढी यात्रेच्या अनुषंगाने शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता, जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभाण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स, स्टॉल्स लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रतिबंध करण्यात आला असून, याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले आहेत.

आषाढी एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, यात्रा कालावधी 26 जून ते 26 जुलै 2025 असा आहे. या सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी व चंद्रभागा स्नानासाठी पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीला येणारे भाविक चंद्रभागा नदीपात्रालगतच असणा-या शेगाव दुमाला येथील भक्तीसागर (65एकर) येथे वास्तव्यास असतात. त्यामुळे शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता या परिसरात भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी असते. आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक भक्तीसागर (65 एकर) परिसरात वास्तव्यास असल्यामुळे सदरच्या ठिकाणी मोठया प्रमाणात दुकाने, हातविक्रेते, तात्पुरती हॉटेल्स, स्टॉल्स लागतात. चंद्रभागा नदीपात्रातील दगडी पूल ते तीन रस्त्यावर भाविकांची, वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी होवून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेगाव दुमाला ते तीन रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होवून चेंगराचेंगरीसारखी घडू नये, यासाठी शेगाव दुमाला रस्ता ते तीन रस्ता, जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स, स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे
सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दर्शनरांगेत घुसखोरी करण्यास प्रतिबंध: आदेश जारी*

आषाढी एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, यात्रा कालावधी 26 जून ते 26 जुलै 2025 असा आहे. या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. दर्शन रांगेत घुसखोरीमुळे अनुचित प्रकार घडून चेंगराचेंगरी अथवा अन्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे 163 (2) कलम अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

आषाढी यात्रा सोहळा कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. यावेळी दर्शनासाठी अनेक तास भाविक दर्शनरांगत उभे असतात. भाविकांना दर्शन सुकररित्या होण्यासाठी दर्शनरांगेचे व्यवस्थापन आवश्यक असून, दर्शनरांगेत घुसखोरी होत असल्याचे प्रसंग प्रसारमाध्यमातून व भाविकांच्या तक्रारीतून निदर्शनास येत आहे. या घुसखोरीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या