सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा वाद लवकरच मिटणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

जिल्ह्यातील काँग्रेसचा वाद लवकरच मिटणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पंढरपूर (प्रतिनिधी)
सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस जिल्ह्यात नव्याने अस्तित्व निर्माण करणार, पदाधिकाऱ्यांचे जे वाद अस्तित्वात आहेत त्यावरही येत्या २१ मे पर्यंत पडदा पडणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंहसिंह मोहिते पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सांगोला येथील कार्यक्रम आटोपून ते रविवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये आले. सोमवारी सकाळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर पंढरपूर शहरातील श्री संत कैकाडी महाराज मठातील कार्यक्रमास हजर झाले. याच ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला.

सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकारी निवडीबाबत, काँग्रेसमध्ये असलेला वाद कधी मिटणार याबाबत विचारले असता त्यांनी, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे लवकरच याबाबत तोडगा काढतील. किरकोळ मतभेदांमुळे हा वाद वाढला असून त्यावर, येत्या २१ मे पर्यंत तोडगा निघेल. यापुढील काळात सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील काँग्रेस पुन्हा भरारी येईल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, किसान सेलचे तालुका अध्यक्ष अक्षय शेळके, ज्येष्ठ काँग्रेस नेते बजरंग बागल, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.


महाविकास आघाडीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात शब्दाला किंमत आहे. शिवसेनेचे खा. संजय राऊत काय बोलतात याचे आम्हाला काही देणे घेणे नाही असे सांगून त्यांनी महाविकास आघाडी भक्कम असल्याचे ठामपणे सांगितले.

मल्लिकार्जुन खर्गेना धमकी..
पटोलींची पंढरपूर पोलिसात तक्रार

काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी दिल्याप्रकरणी , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी या धमकी विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!