भाजपा सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग – डॉ. धवलसिंह मोहिते पाटील


भाजपा सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग – डॉ. धवलसिंह मोहिते पाटील


पंढरपूर (प्रतिनिधी)
देशातील मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात
उभे राहणाऱ्या प्रत्येकास आडवे करण्याचा प्रयत्न करत आहे. देशात लोकशाही नांदण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे आयोजित करण्यात आलेल्या जय भारत सत्याग्रह सभेमध्ये ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रामहरी रुपनवर, प्रवक्ते काका कुलकर्णी यांच्यासह पंढरपूरचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जुन्या केसमध्ये अडकवून, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. भारत जोडो यात्रेदरम्यान काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सुमारे ३७०० किलोमीटरचा पायी प्रवास करून, राहुल गांधींनी मोदी सरकारला हादरवून सोडले. यामुळेच धास्तावलेल्या मोदी सरकारने राहुल गांधी यांचा बंदोबस्त करण्याचा केविलवाना प्रयत्न केला. देशाचे संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे यांनी केले.
यावेळी काँग्रेस नेते विजयकुमार हत्तुरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार, शिवाजी धोत्रे, शेखर पाटील, तालुक्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष राहुल पाटील, ग्राहक सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, काँग्रेसचे पदाधिकारी नागनाथ अधटराव, गणेश सुतार, राजाभाऊ उराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णात माळी, अमोल देवकर, साधू गोडसे आदींसह काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.







