पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून कल्याणराव काळे,भगीरथ भालके यांची माघार तर बारा जागेवर परिचारका विरोधात अभिजीत पाटलांनी थोपटले दंड


(पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक)


परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध
बारा जागेवर अभिजीत पाटलांनी थोपटले दंड


कल्याणराव काळे,भगीरथ भालके यांची निवडणुकीतून माघार
पंढरपूर (प्रतिनिधी)


पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. या दिवसाअखेर परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, इतर १३ जागांसाठी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामधील १२ जागांवर अभिजीत पाटील गट निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करण्यात आले असून, या निवडणुकीत कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांनी विनाअट माघार घेतली आहे.
यामुळे यापुढील काळातही परिचारकांना अभिजीत पाटील हेच राजकीय विरोधक असणार, हे या निवडणुकीच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. या दिवशी परिचारकांचे विरोधक अभिजीत पाटील यांची विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांच्याबरोबर बैठक झाली.
भालके आणि काळे यांनी ही निवडणूक लढवण्यात असमर्थता दर्शवली, आणि लागलीच आपल्या समर्थकांना अर्ज काढून घेण्याचे आदेशही दिले.


कल्याणराव काळे आणि भालके यांच्या समर्थकांनी अर्ज काढून घेतल्याने, परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये व्यापारी मतदारसंघातील सोमनाथ डोंबे, यासीन बागवान, ग्रामपंचायत मतदार संघातील शिवदास वामन ताड, सहकारी संस्था मतदारसंघातील नागनाथ मोहिते, आणि ग्रामपंचायत मतदार संघातील वसंत चंदनशिवे यांचा समावेश आहे. हे उमेदवार बिनविरोध होताच परिचारक समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या विजयी उमेदवारांचा उमेश परिचारक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


या निवडणुकीत परिचारक भालके काळे यांच्याशिवाय अभिजीत पाटील, आ. समाधान आवताडे, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १२ जागांसाठी आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्याने पंढरपूर तालुक्यातील राजकीय वातावरण खळबळून गेले. आता १३ जागांसाठी अभिजीत पाटील गटाचे १२ अर्ज आणि अपक्ष १ अर्ज असे एकूण २९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.


काळे,भालके यांची विनाशर्त माघार
अभिजीत पाटील यांचा प्रहार


कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल चे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी विनाअट माघार घेतल्याने, त्यांच्या राजकीय धोरणांबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. विठ्ठल परिवाराचे नेते अभिजीत पाटील हेच परिचारकांना टक्कर देऊ शकतात हे पुन्हा एकदा, या निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येऊ लागले आहे.





