तेलंगवाडीत एका इसमाचे गळफास घेऊन आत्महत्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात; प्रकरणाचे गूढ वाढले

तेलंगवाडीत एका इसमाचे गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात; प्रकरणाचे गूढ वाढले
मोहोळ( प्रतिनिधी)ः निलंगा जि. लातूर येथील ३६ वर्षीय इसमाने अज्ञात कारणाने मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी गावच्या शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. प्रकाश अभिमन्यू काळे (रा. उस्तरी ता. निलंगा) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.
या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रकाश अभिमन्यू काळे हा पुणे येथे कामास होता. तर त्याचे कुटुंबिय निलंगा येथे राहण्यास आहेत. दरम्यान २३ ऑक्टोंबर रोजी प्रकाश काळे याने सकाळी ७ वाजण्यापूर्वी तेलंगवाडी ता. मोहोळ येथील पवनकुमार सुरवसे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांना सापडलेल्या कागदपत्रांवरुन मृताचे नाव प्रकाश अभिमन्यू काळे असल्याचे समजले.
या प्रकरणी पवनकुमार सुरवसे (रा. तेलंगवाडी ता. मोहोळ) यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रकाश काळे हा पुण्याहून निलंग्याला न जाता तेलंगवाडी येथे कशासाठी आला होता? तसेच त्याने कोणत्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली हे अद्याप समजले नसल्यामुळे या प्रकरणाचे गुढ वाढले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार संतोष चव्हाण हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!