राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्‍या क्रेनने मोटर सायकलस्वारास धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू अज्ञात क्रेन चालकाविरूध्द गुन्हा दाखल

राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्‍या क्रेनने मोटर सायकलस्वारास धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू
अज्ञात क्रेन चालकाविरूध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा(प्रतिनिधी) ः विजयादशमीनिमित्त फुलांचे हार आणण्यासाठी मोटर सायकलवर बेगमपूरकडे निघालेल्या मोटर सायकलस्वारास दिलीप बिडकॉन लि.कंपनीच्या कामावर असलेल्या क्रेनने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ब्रम्हपुरीचे माजी उपसरपंच सुनिल सुरेश पाटील हे गंभीर जखमी होवून जागेवरच मयत झाले. तर राजेंद्र दगडू पुजारी हे जखमी झाले असून निष्काळजीपणे व अती वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिलीप बिडकॉनच्या क्रेनचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील मयत सुनिल पाटील व राजेंद्र पुजारी हे दोघे एम एच १३ बी.एस.५३८५ या मोटर सायकलवरून विजयादशमीच्या पूजेसाठी बेगमपूर येथे दि.१५ रोजी सकाळी १०.४५ वा. हार आणण्यासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्ग कामावरील दिलीप बिडकॉन कंपनीचा क्रेन क्र.एम.एच.१३ डी.ई.७३१० याने पाठीमागून भरधाव वेगाने येवून माचणूर चौकात मोटर सायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने मयत सुनिल पाटील हे त्या क्रेनच्या पुढील टायरखाली गेल्याने चाक डोक्यावरून जावून त्यांचा जागीच अंत झाला. तर त्यांचे साथीदार राजेंद्र पुजारी हे या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे दाखल करण्यात आले. या घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,सहाय्यक पोलिस निरिक्षक सत्यजीत आवटे आदीनी घटनास्थळी येवून गर्दी हटवून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला.याची फिर्याद गोपाळ पवार याने दिल्यावर क्रेनच्या अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!