सांगोल्यात वीज पडून म्हैस ठार, एका घराची पडझड

सांगोल्यात वीज पडून म्हैस ठार, एका घराची पडझड
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला शहर व तालुक्यात रविवार ९ ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मेघगर्जनेसह परतीच्या पावसाने धुवॉंधार बरसात केल्याने फळबागांसह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून एका ठिकाणी वीज पडून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती सांगोला तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यात रविवारी पडलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले. रस्त्यांवरील खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना वाहने चालविण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. तालुक्यात काही दिवस सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे, भाजीपाला, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. अतिपावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा चांगला पाऊस होत असून काही भागात मोठ्या प्रमाणात व सततचा पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.
सांगोला शहर व तालुक्यात रविवारी रात्री झालेला पाऊस मंडलनिहाय पुढीलप्रमाणे, सांगोला ४७ मिमी, हातीद ६ मिमी, नाझरा ४० मिमी, संगेवाडी २ मिमी, सोनंद १६ मिमी, जवळा ४ मिमी, कोळा ६० मिमी, शिवणे १२ मिमी असा २१० मिमी पाऊस झाला असून सरासरी २३.३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. चोपडी ता.सांगोला येथे पावसाने एका घराची पडझड झाली असून वित्तहानी झाली आहे. तर चिणके येथे वीज पडून विजय आनंदा मिसाळ याची म्हैस मयत झाली आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात सांगोला तालुक्यात ४६८ पाऊस पडणे अपेक्षित असताना सरासरीपेक्षा १०३ टक्के म्हणजे ४८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!