पंढरपूर पालवी येथील विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
पंढरपूर पालवी येथील विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
पंढरपूर शहरातील पालवी येथीलआम्ही खऱ्या अर्थाने झालो भारताचे “सुजाण”, नागरिक! जन्मजात मिळालेला विशेष बालकांचा शिक्का….. प्रथम लढाई जीवन-मरणाची. जेथे नियतीने, वैद्यकशास्त्राने हात टेकलेले तेथे ‘पालवी’ने पण केलेला आम्हाला जगवण्याचा, दिर्घायुषी करण्याचा ‘पालवी’ चा मूळ उद्देश व रोजचा प्रयत्न असतो या बालकांना नुसते जीवन नाही, तर सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याचा. ‘पालवी’ त येताना जी बालके मृत्यूच्या दाढेतून, अनाथ म्हणून येतात, त्यांना पालवीने शासकीय कागदपत्रांचा पाठपुरवठा करून, पूर्तता करून सरकारच्या लेखी अस्तित्व दिले. अर्थात शासकीय यंत्रणेतील अपवादात्मक अधिकाऱ्यांच्या मदतीने हे शक्य झाले. आम्हाला आधार कार्ड मिळाले. ‘पालवी’त शिकतानाच जबाबदार नागरिक म्हणजे काय ? त्यांची कर्तव्ये शिकवली जातात. खाणें-पिणें, औषधे, कपडालत्ता आणि शिक्षण याच बरोबर संस्कारांची शिदोरी दिली. आता आमच्याकडे सगळे आहे. फक्त एकच नव्हतं ती म्हणजे शासनदरबारी ओळख.
म्हणूनच जेव्हा आम्ही सज्ञान झालो, आता आम्हाला मतदान करता येईल, हे कळाले त्यांचा आनंद अवर्णणीय होता. भारत देशामध्ये जन्म घेतल्यानंतर भारताचे नागरिकत्व मिळते, घटनेमध्ये नमूद केलेले सगळे हक्क प्राप्त होतात, आचार, विचार, उच्चाराचे स्वातंत्र्य मिळते, संपूर्ण भारतात कोठेही वास्तव्य करण्याची, हवा तो व्यवसाय करण्याची मुभा मिळते. पण हे सारे तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना शक्य होते. आम्हाला यातील प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतंय. जी मुले जगतील का? ही शंका होती, त्या शंकेचे हे निरसन आहे. ही मुले जगून काय करणार? या बेपर्वा प्रश्नाचे हे जबाबदार उत्तर आहे. म्हणूनच ‘पालवी’ तील आम्ही 25 मुलांनी आज आमचा मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रीय कर्तव्यात सहभाग नोंदवला आणि ओठातून उस्फुर्त शब्द बाहेर पडले, “आज आम्ही खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक झालो.”





