अभिजीत पाटीलच विठ्ठल परिवाराचे नेते

अभिजीत पाटीलच विठ्ठल परिवाराचे नेते

पंढरपूर (प्रतिनिधी)

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराचा कायमच दबदबा राहिला आहे. एवढेच नाही तर या तालुक्यावर हुकूमत गाजवण्याचे काम विठ्ठल परिवाराच्या नेत्यांनी केले आहे. विठ्ठल परिवारात सध्याच्या काळात पडझड झाल्याचे चित्र आहे. एवढेच नाही तर विठ्ठल परिवाराचा नेताही बदलला आहे. आजवरच्या इतिहासात विठ्ठलचा चेअरमन हाच विठ्ठल परिवाराचा नेता राहिला आहे. साहजिकच अभिजीत पाटील हेच विठ्ठल परिवाराचे नेते ठरले आहेत.

दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात राजकीय पोकळी निर्माण झाली होती. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विठ्ठल परिवाराचा उमेदवार पराभूत झाला. विठ्ठल कारखान्याचा कारभार ठप्प झाला. मागील गळीत हंगामात कारखाना बंद ठेवावा लागला. यातच चेअरमन भगीरथ भालके सभासदांपासूनही दूर राहिले.
विठ्ठलचे संचालक युवराज पाटील यांनी तर चेअरमन भगीरथ भालके यांच्याविरोधात उघड उघड बंड केले. यातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. या निवडणुकीतून विठ्ठल परिवाराचा नेता निवडला जाणार होता. ही निवडणूक विठ्ठल कारखान्याची नव्हती, तर विठ्ठल परिवाराच्या नेता निवडीची होती. याच पद्धतीने ही निवडणूक लढली गेली. उद्योजक अभिजीत पाटील, संचालक युवराज पाटील आणि चेअरमन भगीरथ भालके यांच्यात तिहेरी निवडणूक पार पडली.
विठ्ठल परिवारातील २५ हजार सभासदांनी या निवडणुकीत चाणाक्षपणे मतदान केले. या निवडणुकीत अभिजीत पाटील हे विजयी झाले.

विठ्ठल कारखाना सुरू करण्याचे कसब अभिजीत पाटील यांच्यातच आहे. कारखाना सुरू करण्याचा प्लॅन त्यांच्याकडेच तयार आहे. हे सभासदांनी हेरले होते. याशिवाय विठ्ठल परिवाराची धुरा सांभाळण्याची क्षमता त्यांच्यातच आहे, हेही सभासदांनी जाणले होते. म्हणूनच विठ्ठलच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांचा दणदणीत विजय झाला. पर्यायाने विठ्ठल परिवाराच्या नेतेपदी अभिजीत पाटील यांची निवड झाली.

दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे विठ्ठल परिवाराचे नेते असल्याच्या थाटात वावरत आहेत. दुसरीकडे संचालक युवराज पाटील यांनी ॲड. दीपक पवार आणि गणेश पाटील यांना सोबत घेऊन, पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात सवता सुभा मांडला आहे.
यामुळे विठ्ठल परिवार तुटल्याचे चित्र पंढरपूर तालुक्यात दिसत आहे.

विठ्ठलची निवडणूक जिंकल्यानंतर अभिजीत पाटील यांनी पंढरपूरमधील शिवतीर्थावर दंड थोपटले होते. हे दंड थोपटणे हे विठ्ठल परिवाराचा नेता असल्याचे द्योतक होते. विठ्ठल परिवाराचा नेता म्हणून विरोधी परिचारक गटावर गाजवलेली हुकूमत होती.

विठ्ठल परिवारात सध्या तीन गट असले तरी, विठ्ठल परिवाराचा नेता या नात्याने अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वास विठ्ठल परिवाराने संमती दिली आहे. विठ्ठलच्या सभासदांनी त्यांना कौल दिला आहे. विठ्ठल कारखान्याचा चेअरमन हाच आजवर विठ्ठल परिवाराचा नेता राहिला आहे. पर्यायाने यापुढील काळात अभिजीत पाटील हेच विठ्ठल परिवाराचे नेते राहणार आहेत. विठ्ठल परिवारातील मंडळी हळूहळू त्यांच्याच नेतृत्वाखाली एकवटणार आहेत. आणि विठ्ठल परिवारास हळूहळू भरती येणार आहे.

error: Content is protected !!